Fact Check: स्पेनच्या चर्चमध्ये भगवान गणेशाची मूर्ती आणल्याचा व्हिडिओ २०२६ मधील नसून २०१७ मधील आहे
स्पेनमधील सेउटा शहरात ऑगस्ट २०१७ मध्ये भगवान गणेशाची मूर्ती चर्चच्या आत आणण्याची परवानगी देण्यात आली होती. त्या काळातील व्हिडिओ २०२६ चा असल्याचे सांगून पोस्ट करण्यात आला आहे.
- By: Sharad Prakash Asthana
- Published: Sep 25, 2026 at 11:57 AM
नवी दिल्ली (विश्वास न्यूज): देश आणि परदेशात अनेक ठिकाणी गणेशोत्सव-२०२६ साजरा केला जात आहे. दरम्यान, सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका व्हिडिओमध्ये दावा केला जात आहे की, स्पेनमध्ये गणपतीची मूर्ती चर्चच्या आत आणण्यात आली. व्हिडिओमध्ये चर्चच्या आत भगवान गणेशाची मूर्ती आणताना पाहिले जाऊ शकते.
विश्वास न्यूजने व्हायरल व्हिडिओची तपासणी केली असता तो ऑगस्ट २०१७ मधील असल्याचे समोर आले. त्यादरम्यान स्पेनमधील सेउटा शहरात गणेशोत्सवाच्यानिमित्त धार्मिक मिरवणूक काढण्यात आली होती. त्यादरम्यान पादरीने (फादर) मूर्ती चर्चच्या आत आणण्यास परवानगी दिली होती. मात्र, यानंतर पादरीने राजीनामा दिला होता.
काय आहे व्हायरल पोस्ट?
फेसबुक युजर ‘Saket Sinha’ ने २० सप्टेंबर २०२६ रोजी एक व्हिडिओ पोस्ट करत लिहिले, “स्पेनमध्ये गणेशजींची मिरवणूक चर्चसमोरील रस्त्यावरून काढण्यासाठी चर्चच्या अधिकाऱ्यांकडे परवानगी मागण्यात आली होती. चर्चच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, गणेशजींची मूर्ती आत घेऊन या, जेणेकरून ते आपल्या सर्वांना आशीर्वाद देतील.”
विश्वास न्यूजच्या व्हॉट्सॲप क्रमांकावर (+919205270923) देखील हा व्हिडिओ पाठवून याची सत्यता तपासण्याची विनंती करण्यात आली आहे.

तपास
व्हायरल दाव्याच्या तपासासाठी आम्ही व्हिडिओच्या की-फ्रेमचा गुगल लेन्सवर शोध घेतला. उद्योगपती आणि महिंद्रा ग्रुपचे चेअरमन आनंद महिंद्रा यांनी ८ सप्टेंबर २०१८ रोजी हा व्हिडिओ शेअर करत लिहिले होते, “जेव्हा गणपती बाप्पाचे आपल्या घरात पुन्हा आगमन करण्याची वेळ आली आहे, तेव्हा हा जुना व्हिडिओ मिळणे खूप छान वाटले. असे दिसते की बार्सिलोना मधील भारतीय समाजाने शहर आणि वाटेत लागणाऱ्या काही चर्चकडून मिरवणूक काढण्याची परवानगी घेतली होती. एका चर्चने त्यांना आत आमंत्रित केले… वसुधैव कुटुंबकम्!”
स्पेनच्या न्यूज पोर्टल ‘elfarodeceuta’ च्या यूट्यूब चॅनेलवर २८ ऑगस्ट २०१७ रोजी गणेशोत्सवाचा एक व्हिडिओ अपलोड करण्यात आला होता. यामध्ये ७:५० मिनिटांनंतर व्हायरल क्लिप पाहिली जाऊ शकते. व्हिडिओसोबत दिलेल्या माहितीनुसार, सेउटामध्ये हिंदू समाजाने गणेशोत्सवाची सांगता एका भव्य धार्मिक मिरवणुकीने केली. या समारंभाची सांगता समुद्रात दोन मूर्तींच्या विसर्जनाने झाली.
याबाबत स्पेनच्या न्यूज पोर्टल ‘larazon’ वर २९ ऑगस्ट २०१७ रोजी एक बातमी प्रसिद्ध झाली होती. यामध्ये व्हायरल व्हिडिओचा स्क्रीनशॉट देखील पाहिला जाऊ शकतो. बातमीनुसार, “सेउटा शहरातील ‘व्हर्जिन ऑफ आफ्रिका’ चर्चमध्ये हिंदू देव गणेशजींच्या मूर्तीला आत आणण्याची परवानगी दिल्यानंतर तेथील पादरीने राजीनामा दिला आहे. चर्चमध्ये गणपतीच्या मूर्तीला प्रवेश देण्याची परवानगी दिल्याबद्दल सेउटाच्या विकार जनरल यांना फटकारण्यात आले होते.”

याबाबत आम्ही स्पेनमध्ये हिंदू धार्मिक कार्यक्रम आणि सणांची माहिती देणारे बार्सिलोनाचे रहिवासी आणि डिजिटल क्रिएटर शरद त्रिवेदी यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांना व्हायरल व्हिडिओ पाठवला. शरद त्रिवेदी ‘Catalunyaar’ हे फेसबुक पेजही चालवतात. त्यांनी सांगितले की स्पेनमध्ये २०२६ मध्येही गणेशोत्सव साजरा केला जात आहे, परंतु हा व्हायरल व्हिडिओ जुना आहे.
काय आहे संदर्भ?
गणेशोत्सवाची सुरुवात १४ सप्टेंबर २०२६ रोजी गणेश चतुर्थीने झाली होती. याची सांगता २५ सप्टेंबर २०२६ रोजी गणपती विसर्जनाने होईल. स्पेनमध्येही भारतीय समाज हा सण साजरा करतो. यूट्यूब चॅनेल ‘FaroTV Ceuta’ वर १५ सप्टेंबर २०२६ रोजी अपलोड केलेल्या व्हिडिओमध्ये स्पेनमधील एका मंदिरात गणेशोत्सवावर आयोजित समारंभ आणि आरती पाहिली जाऊ शकते.
जुना व्हिडिओ शेअर करणाऱ्या युजरच्या प्रोफाईलचे शेवटी आम्ही स्क्रॅनिंग केले. नोएडाचे रहिवासी असलेले हे फेसबुक युजर एका राजकीय पक्षाशी जोडलेले आहेत आणि त्यांचे सुमारे १२ हजार फॉलोअर्स आहेत.
निष्कर्ष: स्पेनमधील सेउटा शहरात ऑगस्ट २०१७ मध्ये भगवान गणेशाची मूर्ती चर्चच्या आत आणण्याची परवानगी देण्यात आली होती. त्या काळातील व्हिडिओ २०२६ चा असल्याचे सांगून पोस्ट करण्यात आला आहे.
- Claim Review : स्पेनमध्ये भगवान गणेशाची मूर्ती चर्चच्या आत आणण्यात आली
- Claimed By : FB User- Saket Sinha
- Fact Check : False
Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know!
Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.











