Fact Check: महाराष्ट्रातील नागपूरमध्ये EVM सह BJP कार्यकर्ते पकडल्याचा दावा FAKE
विश्वास न्यूजने केलेल्या तपासात हा दावा खोटा असल्याचे आढळून आले. व्हायरल झालेला व्हिडीओ महाराष्ट्रातील नागपूरचा आहे, मात्र त्याबाबत करण्यात येत असलेला दावा चुकीचा आहे. ईव्हीएमसह ज्या वाहनाला लक्ष्य करण्यात आले ते झोनल अधिकाऱ्याचे वाहन होते, ज्यामध्ये न वापरलेले ईव्हीएम ठेवण्यात आले होते.
- By: Abhishek Parashar
- Published: Nov 29, 2024 at 05:37 PM
नवी दिल्ली (विश्वास न्यूज). महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये पार पडलेल्या विधानसभा निवडणुकांचे निकाल आले आहेत आणि या संदर्भात, सोशल मीडियावर एक व्हिडिओ क्लिप व्हायरल होत आहे ज्यात दावा केला जात आहे की, महाराष्ट्रातील नागपूरमध्ये, काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन (ईव्हीएम) घेऊन जाणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) कार्यकर्त्यांना पकडले आहे. या ईव्हीएम मशीनच्या मदतीने निवडणूकीच्या निकालात फेरफार केले जाणार होते.
विश्वास न्यूजने केलेल्या तपासात हा दावा खोटा असल्याचे आढळून आले. व्हायरल झालेला व्हिडीओ महाराष्ट्रातील नागपूरचा आहे, मात्र त्याबाबत करण्यात येत असलेला दावा चुकीचा आहे. ईव्हीएमसह ज्या वाहनाला लक्ष्य करण्यात आले ते झोनल अधिकाऱ्याचे वाहन होते, ज्यामध्ये न वापरलेले ईव्हीएम ठेवण्यात आले होते.
निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, निवडणुकीनंतर सर्व ईव्हीएम आणि व्हीव्हीपीएटी चार श्रेणींमध्ये विभागले जातात, ज्यामध्ये D श्रेणीमध्ये न वापरलेले ईव्हीएम आणि व्हीव्हीपीएटी समाविष्ट असतात, जे सेक्टर किंवा झोनल किंवा एरिया मॅजिस्ट्रेटकडे आरक्षित असतात आणि त्यांचा मतदानात वापर झालेला नसतो.
काय आहे व्हायरल प्रकरण?
सोशल मीडिया वापरकर्ती ‘vandanaa_bharat_ki_beti’ ने हा व्हायरल व्हिडीओ (संग्रहित लिंक) शेअर केला आणि लिहिले आहे, “BIG BREAKING* खेळ सुरु. काँग्रेसच्या लोकांनी नागपुरातील झंडा चौकात EVM घेऊन जाणाऱ्या भाजपच्या लोकांना पकडले. आता देखील @ECISVEEP म्हणेल की, EVM सुरक्षित आहे, हे पाहून एवढेच म्हटले जाऊ शकते की, उद्या महाराष्ट्र आणि झारखंडचे निकाल तयार आहेत. मतमोजणी प्रक्रिया अद्याप बाकी आहे. गुप्ता यांनी अमितच्या मनाची गोष्ट आपल्याला सांगितली आहे. राजीव यांनी त्यास यापूर्वीच पूर्ण केले आहे. ईव्हीएम आहे तर मोदी आहे. मोदी आहे तर EVM आहे… अजूनही वेळ आहे EVM वर बारकाईने लक्ष ठेवा अन्यथा हरियाणाचाच निकाल दिसेल.”

नागपूरमध्ये भाजप कार्यकर्ते ईव्हीएमसह पकडले गेल्याचा दावा करणाऱ्या सोशल मीडियावर खोट्या दाव्यासह व्हायरल झालेल्या पोस्टचा स्क्रीनशॉट.
सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर इतर अनेक वापरकर्त्यांनी याच दाव्यासह हा व्हिडिओ शेअर केला आहे.
तपास
ज्या वाहनात ईव्हीएम दिसत आहे, त्या वाहनाचा नोंदणी क्रमांक MH19BU6027 आहे. या आधारावर शोधण्यात आलेल्या माहितीनुसार, हा महाराष्ट्रातील जळगाव येथे नोंदणीकृत क्रमांक आहे.

व्हायरल व्हिडीओच्या मुख्य फ्रेम्सची रिव्हर्स इमेज शोधताना आम्हाला हा व्हिडीओ अनेक बातम्यांमध्ये दिसत असल्याचे आढळले, ज्यानुसार नागपुरातील मतदान पार्टीवर हल्ला केल्याचे प्रकरण आहे, ज्यात काही लोकांनी ईव्हीएम घेऊन जाणाऱ्या निवडणूक अधिकाऱ्यांच्या वाहनावर हल्ला केला होता.
एबीपी लाईव्हच्या अधिकृत यूट्यूब चॅनेलवर अपलोड केलेल्या व्हिडिओ बुलेटिनमध्ये या प्रकरणाबाबत नागपूरचे सहपोलीस आयुक्त, निसार तांबोळी यांच्या वक्तव्याचाही समावेश आहे. तांबोळी म्हणाले, “…त्यांच्या गाडीमध्ये जे ईव्हीएम होते, ते एक स्पेअर (वापर न करता राखीव ठेवलेले) ईव्हीएम होते.”
आणखी एका व्हिडिओ अहवालातही अशाच संदर्भात घटनेचा उल्लेख आहे. वृत्तसंस्था एएनआयच्या अहवालात तांबोळी यांच्या विधानाचा उल्लेख आहे, ज्यात त्यांनी म्हटले आहे की, “कोणत्याही मूळ (मतदानात वापरलेल्या) ईव्हीएमचे नुकसान झालेले नाही.”
या संदर्भात आम्ही नागपूरचे उपजिल्हाधिकारी (निवडणूक अधिकारी) प्रवीण महिरे यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांनी पुष्टी करताना सांगितले की, “हल्ला झालेल्या वाहनात ठेवलेले ईव्हीएम हे मतदानासाठी वापरलेले ईव्हीएम नसून राखीव ईव्हीएम होते.”
त्यानंतर आम्ही नागपूर कोतवाली पोलिस स्टेशनशी संपर्क साधला. पोलिस अधिकारी अतुल मोहनकर यांनी आम्हाला सांगितले की, “या निवडणूक अधिकाऱ्यांच्या वाहनावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत एकूण पाच जणांना अटक केली आहे.”
निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, निवडणुकीनंतर सर्व उपलब्ध ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट यांना चार श्रेणींमध्ये विभागले जाते.

श्रेणी A: ज्याद्वारे मतदान करण्यात आले असे EVMs आणि VVPATs
पहिल्या श्रेणीत अशा ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटचा समावेश होतो, ज्याद्वारे मतदान करण्यात आले आहे आणि ज्यांना मतदान संपल्यानंतर बंद केले गेले आहे.
श्रेणी B: ज्या द्वारे दोषपूर्ण मतदान करण्यात आले आहे असे EVMs आणि VVPATs
यात अशा ईव्हीएमचा समावेश असतो, जे काही मतदान झाल्यानंतर खराब होतात.
श्रेणी C: सदोष पण ज्याद्वारे मतदान करण्यात आले नाही असे EVMs आणि VVPATs
या श्रेणीमध्ये निवडणुकीपूर्वी खराब झालेल्या आणि बदललेल्या मशीनचा समावेश असतो.
श्रेणी D: न वापरलेले EVMs आणि VVPATs
या श्रेणीतील ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट, सेक्टर किंवा झोनल किंवा एरिया मॅजिस्ट्रेटकडे असतात, जी सुरक्षित असतात आणि त्यांचा मतदानासाठी वापर केला गेलेला नसतो.
यापूर्वीच्या इतर निवडणुकांमध्येही असे दावे व्हायरल झाले आहेत. यापूर्वी लोकसभा निवडणुकीदरम्यान वाराणसीत ईव्हीएममध्ये घोटाळा झाल्याचा असाच दावा व्हायरल झाला होता आणि आमच्या तपासात आम्हाला आढळले की होते की, संबंधित ईव्हीएम हे, मोजणी प्रशिक्षणासाठी वापरले जाणारे ईव्हीएम होते. यादरम्यान आम्ही वाराणसीचे उपजिल्हा निवडणूक अधिकारी रणविजय सिंग यांच्याशी संपर्क साधला होता. त्यांनी आम्हाला सांगितले, “निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार सर्व ईव्हीएम हे, श्रेणी D (न वापरलेले ईव्हीएम आणि व्हीव्हीपीएटी) म्हणून वर्गीकृत केले गेले होते, जे निवडणुकीत वापरले जात नाहीत आणि त्यांना निवडणुकीत वापरलेल्या ईव्हीएमसह एकाच स्ट्राँग रूममध्ये ठेवले जात नाहीत.”
संबंधित फॅक्ट चेक अहवाल येथे वाचता येईल.
खोट्या दाव्यासह व्हायरल पोस्ट शेअर करणाऱ्या वापरकर्त्याला इंस्टाग्रामवर पाचशेहून अधिक लोक फॉलो करतात. विश्वास न्यूजच्या निवडणूक विभागात निवडणुकीशी संबंधित इतर व्हायरल दाव्यांचे फॅक्ट चेक अहवाल वाचता येतील.
लक्षात घेण्यासारखा मुद्दा हा की, महाराष्ट्रात 20 नोव्हेंबरला मतदान झाले, तर झारखंडमध्ये 13 आणि 20 नोव्हेंबरला मतदान झाले, त्याचे निकाल आज आले आहेत. भारतीय निवडणूक आयोगाच्या म्हणण्यानुसार, महाराष्ट्रातील एकूण 288 जागांपैकी भाजपच्या नेतृत्वाखालील महायुती (आघाडी)ला दोन तृतीयांशपेक्षा जास्त बहुमत मिळण्याचे अनुमान आहे. त्याच वेळी, झारखंडमध्ये, झारखंड मुक्ती मोर्चा (जेएमएम)च्या नेतृत्वाखालील इंडिया युती, सरकारमध्ये पुनरागमन करत आहे.

निष्कर्ष: महाराष्ट्रातील नागपुरात निवडणुकीत वापरण्यात आलेल्या ईव्हीएमसह भाजप कार्यकर्त्यांना पकडल्याचा दावा खोटा आहे. ईव्हीएमसह ज्या वाहनाला लक्ष्य करण्यात आले ती झोनल ऑफिसरची कार होती, जिच्यामध्ये न वापरलेले ईव्हीएम ठेवण्यात आले होते. या श्रेणीत येणारी ईव्हीएम आणि व्हीव्हीपीएटी मशीन, सेक्टर किंवा झोनल किंवा एरिया मॅजिस्ट्रेटकडे असतात आणि ती राखीव असून त्यांना मतदानात वापरण्यात आलेले नसते.
- Claim Review : नागपूरमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांनी ईव्हीएम घेऊन जाणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांना पकडले.
- Claimed By : Insta User-vandanaa_bharat_ki_beti
- Fact Check : False
Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know!
Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.











